सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रचार केला जात आहे. मशिदींमधून मुल्ला मौलवी प्रचार करत आहेत, असा दावा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केला आहे. राम सातपुते यांच्या या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसची मानसिकता ही जिहादी लोकांना सोबत घेण्याची राहिली आहे. एमआयएमने उमेदवार न दिल्याने मशिदींमधून फतवे निघत आहेत. या फतव्याच्या विरोधात सर्व हिंदू समाज एकत्र होईल आणि नरेंद्र मोदी यांच्या मागे राहील असेही राम सातपुते यांनी म्हटलं आहे.
एमआयएमने उमेदवार दिला नाही, लोकशाही वाचवण्याचे आवाहन
एमआयएमने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात उमेदवार देणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती सोलापुरातील एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित अशी युती असताना प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली होती.
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५८ हजार मतांनी पराभव झाला होता आणि भाजपचे डॉ. जय सिद्धेश्वर महाराज यांचा विजय झाला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमवर सर्वस्तरातून टीका झाली होती. एमआयएम वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता. एमआयएमला भाजपची बी टीम अशी टीका देखील अनेकदा करण्यात आली होती.
मशिदींमधून फतवे निघत आहेत, राम सातपुते यांचा दावा
सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी रविवारी दुपारी माध्यमांना माहिती देताना असा दावा केला, की एमआयएमने उमेदवार दिला नाही, म्हणजे त्यांचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा आहे. तसेच मौलवी हे मोदींना हरविण्यासाठी मशिदींमधून प्रचार करत आहेत. मशिदींमधून फतवे निघत आहेत. हे फतवे सोलापुरातील मशिदींमधून निघत आहेत, मी याचा निषेध करतो, उर्दू भाषेत वेगवेगळे पत्रके निघत आहेत. त्यावरुन राम सातपुते यांनी निषेध व्यक्त केला आहे.