सोलापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०१ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सोलापूर शाखेकडून ज्येष्ठ नाट्य कलावंत. मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडून आलेल्या सूचनेनुसार, अध्यक्षपदासाठी नावे सुचवण्याकरिता सोलापूर शाखेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली.
रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरच्या स्व. पद्माकर देव सभागृहात परिषदेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सभा संपन्न झाली. या सभेत १०१ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या नावावर सविस्तर चर्चा झाली. मोहन जोशी यांनी नाट्य क्षेत्रातील तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून केलेले कार्य अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे. या कार्याची दखल घेऊन, मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या १०१ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी श्री. मोहन जोशी यांचेच नाव सोलापूर शाखेच्या वतीने सुचवण्यात यावे, असा बहुमताने सूर निघाला.
चर्चेत दुसरे नाव: सुरेश साखळकर
दरम्यान, आजीव सदस्य नितीन दिवाकर यांनी याप्रसंगी पुण्याचे सुरेश साखळकर यांचे नावदेखील अध्यक्षपदासाठी सुचवले, ज्यामुळे या दोन नावांची चर्चा सध्या नाट्य वर्तुळात रंगू लागली आहे.
या महत्त्वाच्या सभेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्य आणि सल्लागार मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर शाखेने सुचवलेले नाव आता मध्यवर्ती शाखेकडे पाठवले जाईल आणि अंतिम निर्णय परिषदेकडून घेतला जाईल.

























