बार्शी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी बार्शीत समजतात शहरभर शोकाकुल वातावरण झाले. शहराच्या विविध भागात आणि चौकाचौकात अजितदादाच्या निधनाच्या बातमीची चर्चाच सर्वत्र सुरु होती.
उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे अनेक वेळा बार्शीत विविध राजकीय आणि विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. आमदार दिलीप सोपल यांच्यासह माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्याशी त्यांचे खूप घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते.
अजितदादांचा वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड वृत्तीमुळे ते बार्शीत देखील प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे सध्याच्या तरुणांना अजित पवार यांचे खूप मोठे आकर्षण होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजतात अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. अजित पवार यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील मोठा वचक होता त्यामुळे अजित पवार यांचा दौरा असल्यानंतर ते काय प्रश्न विचारतात यामुळे अनेकांची भंबेरी उडत होती.
अजितदादा यांचे आणि माझे संबंध १९९१ पासून आजनपर्यंत होते. त्यांनी विकासाकडे बघत बार्शीला कधीच निधी कमी पडू दिला नाही. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा दृष्टिकोन अजितदादा ठेवून असत. जातीच्या पलीकडे जाऊन ते नेहमीच राजकारण करत होते, अशी भावना आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांची पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची पद्धत निश्चितच वाखाणण्याजोगी होती. मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी मला कधीच दुजाभाव न करता सढळ हाताने बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी निधी दिल्याची भावना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना ही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वस्व गेल्याची भावना निर्माण होत आहे. त्यांनी राजकारणात नेहमीच सहकार्य केल्यामुळेच आपण ठाम राहिलो अशी सद्गदित भावना माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी व्यक्त केली.
शहरात आणि चौकात ठिकठिकाणी वातावरण सुन्न झाले होते. तर शहरातील सर्व शाळेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करुन सर्व शाळा सोडून देण्यात आल्या. तीन दिवसाचा शासकीय दुःखवटा असल्याने नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा देखील अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज सर्वांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कामाबद्दल चर्चा करताना आ. दिलीप सोपल.

















