अक्कलकोट – परमपुज्य थोर स्वामी भक्त कै.ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार दिला जातो. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व विविध क्षेत्रांमध्ये समाज जीवन उजळविणाऱ्या प्रतिभावान व्यक्तीमत्वास वर्षाचा ज्ञानदीप पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील तसेच श्री स्वामी समर्थांच्या सेवेतील योगदानाची दखल घेवून महेश इंगळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी दिली.
नुकतेच श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने थोर स्वामी भक्त प.पू.कै.ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा ज्ञानदिप पुरस्कार स्विकारण्यास उपस्थित राहण्यासंदर्भांत श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात नगरसेवक व चेअरमन महेश इंगळे यांची भेट घेवून निमंत्रण व निमंत्रण पत्रिका दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले बोलत होते.
पुढे बोलताना अध्यक्ष नारायण बुधले यांनी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात भारत भ्रमण करून जगाचा कल्याणाचा ध्यास घेत अध्यात्माचा मार्ग भाविकांना दाखविला. स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण अक्कलकोट मध्ये येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे.
अशा या पवित्र ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आपले वडील कै.कल्याणराव-बाळासाहेब इंगळे यांच्या अध्यात्मिक संस्कारातून श्री स्वामी सेवेचा वसा समर्थपणे सांभाळाला आहे. भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून सामाजिक भान जपले आहे. स्वामींचा महिमा सर्व दूर व्हावा यासाठी अविरतपणे श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती कार्यरत आहे.
त्यामुळे या ट्रस्ट द्वारे होणाऱ्या योगदानाची दखल घेऊन व त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन येत्या दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर कोल्हापूर येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना यंदाच्या ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रुपये रोख एक लाख रुपये असे आहे, तरी सन्माननीय महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाचे वतीने देण्यात येणारा आमचा ज्ञानदीप पुरस्कार स्वीकारून आमच्या पुरस्कार वितरण सोहळ्याची व श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीने स्वामी प्रकट दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही मनोगत श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी केले आहे. यावेळी प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, विरेश पांचाळ, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीशैल गवंडी आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.
(चौकट – आपणांस लाभणारा ज्ञानदीप पुरस्कार हा परमपूज्य काटकर साहेबांचा एका प्रकारे आशीर्वादच आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आणखीन जोमाने स्वामी सेवा करण्यास मानसिक बळ मिळेल, तसेच पुरस्काराच्या माध्यमातून प्राप्त होणारा रक्कम रुपये एक लाख रुपयांचा धनादेश हे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यासाठी वापरण्यात येईल – श्री.महेश क.इंगळे – चेअरमन तथा नगरसेवक श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट)
(चौकट – यापूर्वीही ज्ञानदीप पुरस्कार सन २०२३ साली महाबळेश्वर येथील सनराइज् कॅन्डल्सचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया, सन २०२४ चा पुरस्कार भारतीय सैन्य दलातील स्वयंसिद्धा सुमेधा चिथडे, सन २०२५ चा पुरस्कार मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटलचे नेत्र विभाग प्रमुख व १,६३,०००/- एक लाख त्रेसष्ट हजार यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करणारे निष्णात सर्जन डॉ.तात्याराव लहाने यांना देण्यात आले आहे. – नारायण बुधले – अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ, प्रज्ञापूरी, कोल्हापूर)
फोटो ओळ – ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा व श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नगरसेवक महेश इंगळे यांना देताना अध्यक्ष नारायण बुधले, प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, विरेश पांचाळ व अन्य दिसत आहेत.



























