मुदखेड / नांदेड – आगामी मुदखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या परीने जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मात्र, या तयारीच्या गडबडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अडचणी वाढताना दिसत आहेत.
शहरात नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्षाला उमेदवारच मिळत नसल्याची जोरदार चर्चा सध्या मुदखेडमध्ये सुरू आहे. या अडचणींची प्रचीती दि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी वैष्णवी मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आढावा बैठकीत दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक म्हणून ओमप्रकाश पोकर्णा व नागनाथराव घिसेवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांसह अनेक इच्छुकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पक्षातील नाराजीचे मुख्य कारण म्हणजे, मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेली मुदखेड शहर व तालुका नवीन कार्यकारिणी. या कार्यकारिणीची निवड करताना निष्ठावंत, जुने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. जुन्या निष्ठावंतांना डावलून ही निवड करण्यात आल्यामुळे पक्षाचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या अंतर्गत कलहामुळे आणि निष्ठावंतांवरील अन्यायाच्या भावनेमुळे, जी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहरात मजबूत फळी (कार्यकर्त्यांची साखळी) निर्माण झाली होती, ती आजच्या घडीला विस्कळीत झाली आहे. परिणामी, आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) उमेदवार मिळणेही कठीण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सध्या मुदखेडच्या नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.






















