मुंबई : मुंबईतल्या सगळ्या भागात भाजपला मते मिळाली असून धर्म, भाषा, समाजाच्या पलिकडे जाऊन जनतेने आपल्याला मतं दिली आहेत. मुंबईला स्वतःची जाहगीर समजणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे की ते विकासाच्या आणि भाजपच्या सोबत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने १३६ जागा लढवत तब्बल ८९ नगरसेवक निवडून आणले. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दादर येथील मुंबई भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईतील पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, “आज मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष ठरला आहे. आजच्या महानगपालिकेच्या निवडणूकीने आपली शक्ती काय आहे आणि आपले कार्यकर्ते मनात आणलं तर काय करू शकतो हे दाखवून दिले. या निवडणुकीत मुंबईच्या जनतेने आपल्या विकासाच्या अजेंड्याला पूर्ण समर्थन दिले आणि भाजपला ८९ जागा निवडून दिल्या असून भाजपला ४५ टक्के मते मिळाली आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष शिवसेना पक्षानेही २९ जागांवर विजय खेचून आणला.”
ते पुढे म्हणाले, ” मुंबईतल्या झोपडपट्टीतही आणि बिल्डिंगमध्ये आम्ही निवडून आलो. असा एकही भाग नाही जिथे भाजपला मत मिळालेले नाही. त्यामुळे, सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी अशाप्रकारचं यश हे भाजपाने मिळवलेलं आहे. या विजयाचा आनंद आहे मात्र या आनंदाला आम्ही कधीच उन्मादात परिवर्तित होऊ देणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो.”
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम म्हणाले, “महायुतीला प्राप्त झालेला हा विजय मुंबईतल्या मराठी माणसांचा आणि मुंबईकरांचा आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाचा आणि मुंबई भाजपच्या अथक परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. येत्या काळात शहराची सुरक्षितता अबाधित ठेवत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मुंबईला देण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील.
यावेळी व्यासपीठावर प्रवीण दरेकर, मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, गणेश खणकर, श्वेता परुळकर, आमदार प्रसाद लाड, मनिषा चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















