सोलापूर – मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध घोषणा देत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गेल्या तीस वर्षांत मराठा समाजातील प्रतिनिधीला महापौरपदाची संधी मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जाधव म्हणाले की, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारने सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवरही ओबीसी समाजातील उमेदवाराला महापौरपदी संधी दिली. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत असल्याची भावना समाजामध्ये तीव्र झाली आहे. “महापौरपदावर मराठा समाजाचा प्रतिनिधी बसवला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.























