बारामतीप्रमाणेच नगरमध्ये भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून करण्यात आला आहे. या संदर्भात लंके यांनी भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निलेश लंके यांनी तीन व्हिडीओ शेअर केले आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाच व्हिडिओ समोर आला आहे. निलेश लंके म्हणाले की, बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडिओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
काय आहे प्रकरण?
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे ही घटना घडली आहे. पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते रविवारी मध्यरात्री भिडले. पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला आहे. पारनेर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही.
निलेश लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे.या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतना दिसत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन गटात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला. घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.