पावसाळा सुरु होऊन अठरा दिवस उलटले. मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. शेतकऱ्यांनी कापसाची धूळ पेरणी केली. मागील चार दिवसात जिल्ह्यातील काही भागात तूरळक पाऊस झाला खरा. मात्र, तापमानाचा आकडा ४० अंशच्या कमी झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच कापसाची पेरणी केली. त्या शेतात अंकुर फुटले आहेत. वातावरण असंच राहिलं तर दुबार पेरणीचे संकट ओढावेल ही चिंता बळीराजाला सतावत आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार, मान्सून लवकर येईल या आधारावर जिल्ह्यातील जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. पाऊसच आला नसल्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता मावळत आहे. काही दिवस पावसाचा असाच खंड पडला तर शेतकऱ्यांवर दुबार बियाणे खरेदीची वेळ येण्याची भीती बळीराजाला आहे.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झालं आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात होणारा उकाडा नागरिकांना नकोसा झाला आहे. सामान्य नागरिक आणि बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत आहे.
अरबी समुद्राकडून येणारे मॉन्सून वारे कमजोर
विदर्भात मान्सून अद्यापही सक्रिय झाला नाही याचे कारण सांगताना प्राध्यापक सुरेश चोपणे म्हणाले, गेल्या दशकापासून मॉन्सून १५ दिवस पुढे गेला आहे त्यामुळे जून मध्ये फारसा सशक्त दिसत नाही. विशेषतः अरबी समुद्राकडून येणारे मॉन्सून वारे कमजोर असतात तर विदर्भात बंगालच्या खाडी कडून येणारे वारे पाऊस घेऊन येत असतात असे चित्र आहे.
मजुरांच्या हाताला रोजगार
उन्हाळ्यातील चार महिने रिकाम्या हाताने असलेल्या मजुरांना कापूस लागवडीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. काही भागात अधिकची मजुरी देऊनही मजूर मिळेना अशी स्थिती आहे. कापूस लागवडीसाठी चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना मजुरांना घेऊन जावे लागते.
बिजाईसाठी शेतकरी तेलंगणात
जिल्ह्यात काही कंपन्यांच्या बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे. हे बियाणे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणातील कृषी केंद्रावर गर्दी करत आहेत. सीमावर्तीत भागातील बहुतांश शेतात तेलंगणातील बियांणांची पेरणी केली गेली आहे. तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रातील बिजाई स्वस्त दरात आहे. तरी सुद्धा शेतकरी अधिक दर देऊन तेलंगणातील कृषी केंद्रातून बिजाई खरेदी करीत आहेत.