तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : राज्यातील शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने नरसी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शेतकरी नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे कर्ज माफ करून ‘सातबारा’ कोरा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. यासोबतच, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच विधवा महिलांचे व दिव्यांगांचे रखडलेले प्रश्न तात्काळ सोडवावेत, अशाही मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या जुजबी धोरणांवर टीका करत संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर, नायगाव तालुकाध्यक्ष गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नरसीतील मुख्य चौकात आंदोलनकर्ते एकत्रित झाले. “जय जवान, जय किसान”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दोन तास चक्का जाम आंदोलन करून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.यावेळी, आंदोलकांनी नायब तहसीलदार विजय येरावार, मंडळ अधिकारी सौ. शितल स्वामी, तसेच तलाठी शाम मुंडे यांच्याकडे निवेदन सादर केले.
आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी रामतीर्थचे सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरसी बिटचे जमादार चंद्रमणी सोनकांबळे, पो. हे. काॅ. कामपर्णे, पो. हे. काॅ. गणपत राठोड व अन्य पोलीस कर्मचारी वर्गाचा फौजफाट्यासह मोठा बंदोबस्त तैनात केला होता. प्रहार जनशक्तीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी काळात यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल.