सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या मंद्रूप जिल्हा परिषद गट राष्र्टवादीच्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते .
मंद्रूप जिल्हा परिषद गट राष्र्टवादीकडे ठेऊन इतर जिल्हा परिषद गट मित्रपक्षांना देण्याचा प्रयत्न सुरू असुन त्यासाठी काॅंग्रेस, शिवसेना व भाजपाच्या नेत्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस सह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र लढण्याचा आग्रह असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाची आघाडी व युतीचा प्रस्ताव फेटाळणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंद्रूपच्या राष्र्टवादीच्या नेत्याची धावपळ व्यर्थ ठरणार का ? हे पाहावे लागणार आहे.
मंद्रूपमधील राष्र्टवादीच्या नेत्यानी पक्ष निरीक्षकांशिवाय युती व आघाडीची चर्चा सुरू केल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाचे सहनिरीक्षक डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूकी संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितला आहे. मात्र तालुक्यातील राष्र्टवादीचे नेते काॅंग्रेस, शिवसेना व भाजपाबरोबर युतीबाबत चर्चा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत वैभव हत्तुरे वगळता एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यामुळे सत्ताधारी राष्र्टवादी काॅंग्रेसची नाचक्की झाली असून जिल्ह्यातील नेते जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे एका पदाधिकार्याने सांगीतले. सर्वत्र भाजपाची लाट असून या लाटेमध्ये राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे दक्षिणमधील मंद्रूपमध्ये प्राबाल्य होते. गत निवडणूकीत राष्र्टवादीच्या विद्युलता कोरे यांनी भाजपाच्या सविता मेंडगुदले यांचा ९९ मतांनी पराभव करून गड ताब्यात ठेवले होते. मात्र यावेळी राष्र्टवादीचे विभाजन झाले असून व राष्र्टवादीचे नेते गोपाळराव कोरे यांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ नेतृत्वाला पोरका झाला आहे.
या मतदारसंघात राष्र्टवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा बारा बलुतेदारांचा वर्ग असल्यामुळे यावेळी ही निवडणूक राष्र्टवादी काॅंग्रेस अजीत पवार गटासाठी अवघड जाणार आहे. त्यामुळे मंद्रूपमधील नेत्याकडून काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली असून भाजपाच्या नेत्याबरोबरही गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. काॅंग्रेसचे कार्यकर्ते व नेते दक्षिणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असल्याने काॅंग्रेससोबत आघाडी होणार नाही. तर शिवसेना नेत्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसल्याने राष्र्टवादी नेत्याची धावपळ व्यर्थ ठरणार का ? हे पाहावे लागणार आहे.
मंद्रूप जिल्हा परीषद व पंचायत समिती गण ताब्यात ठेवण्यासाठी या नेत्याची धावपळ सुरू आहे. मात्र या भागात अॅंटी इन्कम्बन्सी असल्याने त्याचा फटका राष्र्टवादीच्या उमेदवारीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात व मतदारसंघात एकही पदाधिकारी तयार करण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यां मधून नाराजी आहे. शिवाय गावातील खोळंबलेल्या विकासकामांमुळे मतदारांमधून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांच्या समर्थकांकडून उर्वशीराजे मोहीते पाटील यांनी निवडणूक लढविण्याची मागणी होत आहे.
राष्र्टवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन म्हणून युती व आघाडीबाबत चर्चा केल्याचे सांगत असले तरी राष्र्टवादीचा प्राबाल्य असलेल्या मंद्रूप जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवणे, हा त्यामागील उद्देश्य असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील पुर्वानुभव पाहता मतदारसंघातील इतर गावातूनही नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाच्या लाटेत राष्र्टवादीच्या घड्याळाची टिकटिक सुरू राहणार कि घड्याळ बंद पडणार ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.



















