नाशिक, २६ जून (हिं.स.) : विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रत्यक्ष अनुभवाने अधिक समृध्द शिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील समर इंटर्नशिप प्रोग्राममधील ‘मार्क द हाफ वे’ विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणाबरोबर संवाद कौशल्य वाढीस लागावे याकरीता समर इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. आरोग्य शिक्षणसोबत इतर क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येते. कला, नाटय व योग अभ्यास आदीं विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थ्यांना येणारा मानसिक तणाव व त्यावर समुपदेशन आदी बाबी महत्वपूर्ण आहेत. शिस्त व वक्तशिरपणा यांची सांगड या उपक्रमात घालण्यात येते. भविष्यातील संधी ओळखून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या धोरणानुसार एकात्मिक शिक्षणावर विद्यापीठाकडून भर देण्यात येत आहे. समर इंटर्नशिप प्रोग्रामला विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सुमारे तिनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. या उपक्रमात विविध विद्याशाखांचे विद्यार्थी एकत्रित येऊन शिक्षण घेतात. एकत्रित शिक्षणात विचारांची व ज्ञानाची देवाण-घेवाण होते त्यातून समृध्द समाज घडतो असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाचा समर इंटर्नशिप प्रोग्राम उपक्रम चार आठवडयांचा असतो त्यापैकी दोन आठवडे यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे निरोप देण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थी हा केंद्रबिंदु असून त्यासाठी विविध उपक्रम राबिविण्यात येतात. उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. सामाजिक दायित्व आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने समर इंटर्नशिप प्रोग्राम हा शिक्षणातील महत्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले की, या उपक्रमात विद्यार्थ्यांना संशोधन, मूलभूत तत्व व योग शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येते. शैक्षणिक विकासाचा टप्पा पूर्ण करतांना त्याचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. श्रावणी गोडसे व कु. ईश्वरी जोशी यांनी समर इंटर्नशिप प्रोग्राम उपक्रमाविषयी प्रतिक्रिया मांडल्या. याप्रसंगी समर इंटर्नशिप उपक्रमातील विद्यार्थ्यांनी समूहगीत व नाटय सादर केले. या कार्यक्रमास राज्यातील विविध संलग्नित महाविद्यालयातील प्रतिनिधी व शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे शिक्षक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.