तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या उपस्थितीतच बेशिस्त रिक्षावाले रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट पाहणे, अघोषित स्टॅंड तयार करणे आणि डावीकडून उजवीकडे बिनधास्त वळणे – हे सगळं शहरवासीयांच्या नजरेसमोर आणि धक्कादायक म्हणजे वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर खुलेआम सुरू आहे.
सामान्य नागरिकांनी आपल्या दुचाकी थोडीशीही चुकीच्या ठिकाणी लावली, तर त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई होते. मात्र हेच नियम रिक्षाचालकांवर लागू होत नसल्याने, कुणाच्या आशीर्वादाने ही मोकळीक त्यांना मिळतेय? असा थेट प्रश्न आता शहरवासीय विचारू लागले आहेत.
वाहतूक पोलिसांच्या अशा ‘बघ्याच्या’ भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काहीजण तर असा आरोप करत आहेत की, “यामागे कोणीतरी ‘साहेबांची’ परवानगी असावी, म्हणूनच पोलिस गप्प बसतात.”
शहरातील चौकाचौकांत, विशेषतः बस स्टँड, कोर्टासमोर, भाजी मार्केट आणि बार्शी नाका परिसरात ही परिस्थिती अधिक तीव्र आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या मते, ही वाहतूक अडचण केवळ त्रासदायक नसून आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडथळाही ठरू शकते.
सर्वसामान्यांचा प्रश्न स्पष्ट आहे:
रिक्षावाल्यांवर कारवाई का नाही?”
“हे सगळं कुणाच्या छत्रछायेखाली चालतंय?”
“वाहतूक पोलिस फक्त सामान्य जनतेवरच कठोर आहेत का?”
प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कारवाई करावी आणि रस्त्यावरील अराजकता थांबवावी, हीच धाराशिवकरांची मागणी आहे. अन्यथा, नागरिक रस्त्यावर उतरून या गोंधळाविरुद्ध आवाज उठवण्यास भाग पडतील.