सोलापूर : महानगरपालिकेकडे येणाऱ्या सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी नवीन लाईट पोल उभारण्याची आवश्यकता आहे तसेच एलईडी दिव्यांची मागणी आहे, त्या ठिकाणी पाहणी करून प्राधान्याने कामे पूर्ण करावीत.यासोबत जुन्या व धोकादायक वायरिंगचे नूतनीकरण, सण-उत्सव काळातील विशेष प्रकाशयोजना, तसेच पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणांची तपासणी करण्याचे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज सोलापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाची सविस्तर आढावा बैठक महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे तसेच विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ मधील संबंधित अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
शहरातील एलईडी दिवे,देखभाल दुरुस्ती कामे तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा यावेळी घेण्यात आला.बैठकीत महापौर विनायक कोंड्याल यांनी विद्युत विभागातील अडीअडचणी जाणून घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. विद्युत विभागाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील बंद दिवे, खराब लाईट पोल, उशिरा होणारी दुरुस्ती, नव्या वसाहतींमध्ये प्रकाशयोजनेची गरज आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील अंधाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण करून आवश्यक तेथे अतिरिक्त प्रकाशयोजना करण्यावरही भर देण्यात आला. शहरातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व अखंडित प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत कामकाजात गती आणावी व पारदर्शकता राखावी. शेवटी विभागनिहाय प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. ठराविक कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
एलईडी प्रकल्पामुळे दरवर्षी ५० लाख रुपयांची वीज बचत
सोलापूर शहरात एक्सेल कंपनीच्या माध्यमातून सुमारे ५० हजार एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या एलईडी प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे ५० लाख रुपयांची वीज बचत होत असून, पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत देखभाल खर्चातही लक्षणीय घट झाली आहे. तसेच एलईडी दिव्यांमुळे शहरातील रस्ते अधिक प्रकाशमान झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे.

























