सोलापूर, 27 जून (हिं.स.) सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे सक्रिय झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तडीस नेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर महापालिकेसह अन्य शासकीय आढावा बैठका घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. दुसरीकडे मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात कृतज्ञता मेळावे घेऊन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना राजकीय वर्तुळात आक्रमकता दाखवली आहे. यातून त्यांची काही विधाने स्फोटक आणि वादग्रस्त ठरली आहेत. यातून त्या भाजपला पुन्हा अंगावर घेत आहेत.
दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसची पक्ष भक्कम करण्याची जबाबदारीही त्यांनाच पेलावी लागणार असल्यामुळे त्यादृष्टीने त्यांना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
एकेकाळी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेसची सोलापुरातील स्थिती गेल्या दहा वर्षांत दयनीय झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहापैकी पाच विधानसभा क्षेत्र महायुतीच्या आहेत. तर केवळ सोलापूर शहर मध्य ही एकच जागा काँग्रेसच्या ताब्यात प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून राहिली आहे. त्या आता खासदार झाल्यामुळे त्यांनी आमदारकी सोडली आहे. आगामी सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत इतरांस उमेदवारी मिळवून देऊन निवडूनही आणायचे आहे.