सोलापूर, 27 जून (हिं.स.) देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पताकाधारी स्वारारुढ मोहिते -पाटील यांचा बलराज अश्व गुरूवारी दुपारी पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करून देहुकडे रवाना झाला. दरम्यान, ५ वर्षे वयाचा बलराज उदयपूर राजघराण्यातील जातीवंत मारवाड अश्वाचा अबलख वंश असून त्याचे हे सोहळ्यातील ३ रे वर्ष आहे.
पालखी सोहळ्यातील रिंगणात देवाचा व पताका धारी स्वाराचा असे दोन मानाचे अश्व असतात. त्यापैकी पताकाधारी स्वाराचा अश्व देण्याची प्रथा गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सुरु केली असून ती प्रथा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे पुढे चालवित आहेत.
मोहिते पाटील कुटुंबाकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीही अश्व दिला जायचा. मात्र पुढे सुमारे ४० वर्षापुर्वी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अश्व अचानक आजारी पडल्याने देहु संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे एक अश्व कायमस्वरुपी देण्याची मागणी केली, ती त्यांनी मान्य केली. ती परंपरा आजतागायत जपली आहे.