सोलापूर : तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवीला सोलापूरच्या पद्मशाली समाजातील 25 जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 25 तसेच समाजबांधवांतर्फे सामूहिक ‘पुट्टींटी पट्टूचिरा’ अर्थात माहेरची साडी अर्पण करण्यात आली.तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात सध्या ब्रह्मोत्सव सुरू आहे.
या मंदिरात देवीला सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना माहेरची साडी अर्पण करण्याचा मान आहे. सोलापुरातील पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून साडी अर्पण करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
यंदा या उपक्रमात पद्मशाली समाजाचे 25 जोडपी सहभागी झाली. त्यांनी प्रत्येकी एक असे एकूण 25 तसेच सामान्य समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून एक असे मिळून एकूण 26 रेशमी महावस्त्र देवीला अर्पण करण्यात आल्या.
यंदा हा कार्यक्रम शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. याकरिता पद्मशाली बांधव गुरुवारी 20 नोव्हेंबरला तिरुपती येथे पोहोचले होते. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी येणार असल्याने देवस्थानच्या सूचनेनुसार सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी गुरुवारीच माहेरची साडी अर्पण केली. साडी अर्पण कार्यक्रमावेळी पद्मशाली बांधवांनी पद्मावतीदेवी मंदिर परिसरात भगवान बालाजी, पद्मावती, जय मार्कंडेय, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषात केला. या कार्यक्रमानंतर पद्मशाली बांधवांनी तिरूमला येथे जाऊन भगवान बालाजींचे दर्शन घेतले.
यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी, सचिव व्यंकटेश पडाल, सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली, खजिनदार नागेश सरगम, दतू पोसा, श्रीनिवास करली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश दोंता, विश्वंभर मामडयाल, दिगंबर इप्पलपल्ली, श्रीहरी म्याकल, लक्ष्मीनारायण दुस्सा, माधवी अंदे, सुलक्षणा पोन्नम, लक्ष्मण पुल्ली,जयंत कोंडा, अजय पोन्नम, पापय्या दिकोंडा, मनोहर गुर्रम, नरेंद्र आडम, नामदेव बल्ला,पेंटा, कोटा आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते. या यात्रेचे नियोजन पुण्य श्रीवारी सेवाचे स्वाती चिटकेन, रघुनंदन चिटकेन व प्रज्ञा इप्पलपल्ली यांनी केले.


















