मंगळवेढा – लग्नात हुंडा दिला नाही तसेच मानपान केला नाही असे म्हणून माहेरहून पैसे घेवून का येत नाही? या कारणावरुन एका 32 वर्षीय विवाहितेस बेदम मारहाण करुन शारीरिक, मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पती मारुती वाघमोडे,सासू शांताबाई वाघमोडे,सासरा शंकर वाघमोडे,दीर संजय वाघमोडे (सर्व रा.पानीव ता.माळशिरस) यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विवाहिता राणी मारुती वाघमोडे (वय 32,सध्या रा.धर्मगाव रोड,मंगळवेढा) हिचा विवाह दि.19/4/2009 रोजी पानीव-वैदवस्ती ता.माळशिरस येथील मारुती शंकर वाघमोडे यांच्याशी झाला होता. सदर लग्नात फिर्यादीच्या वडिलाने रितीरिवाजाप्रमाणे मानपान केला होता.
लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदण्यासाठी गेली होती. लग्नानंतर 8 वर्षांनी फिर्यादीचा पती,दीर,सासू,सासरे यांनी फिर्यादीस व्यवस्थित नांदवले नाही,तसेच तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही, हुंडा दिला नाही असे म्हणत शिवीगाळी,दमदाटी करुन मानसिक त्रास देवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असे. घडला प्रकार फिर्यादीने वडिल,भाऊ व इतर नातेवाईक यांना सांगीतला होता. तद्नंतर माहेरील नातेवाईक येवून पती,दीर,सासू यांना समजावून सांगीतल्यामुळे काही दिवस त्रास दिला नाही. पुन्हा माहेरहून पैसे वडिलाकडून घेवून ये असे म्हणून फिर्यादीस मारहाण करु लागले. त्यामुळे फिर्यादीने दि.11/4/2018 रोजी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. त्याचा राग मनात धरुन माहेरी मंगळवेढा-धर्मगाव येथे येवून वरील आरोपी मारहाण करु लागल्याने दि.16/9/2023 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
आरोपींनी दि.19/4/2009 ते दि.19/11/2025 च्या दुपारी 1 वाजेपर्यंत सासरी व माहेरी तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही,लग्नात हुंडा दिला नाही असे म्हणून मानसिक त्रास देवून जाचहाट करुन फिर्यादीस कुर्हाडीच्या लाकडी दांड्याने पाठीवर,पायावर मारुन गंभीर जखमी करुन जाताना तुला व तुझ्या मुलांना जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
























