मंठा प्रतिनिधी :
तळणी ते वाघाळा रस्त्यावर शाळेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्यात अडकल्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्या गाड्या गुडघाभर पाण्यात लोटून बाहेर काढल्या.ही घटना गुरुवार (ता.१ ) रोजी तळणी ते वाघाळा रस्त्यावर टाकळखोपा गावात सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडली.मंठा तालुक्यात तळणी सर्कल मधील इंचा टाकळखोपा ,वाघाळा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्या खड्डयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी तीन ते चार गाड्या मधुन तीस पस्तीस विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते.परंतु विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यात बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून ही बंद पडलेली वाहने लोटत खड्डया बाहेर काढली.काही विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा देखील होती.
शेगाव ते पंढरपुर दिंडी महामार्गावर पुर्णा पाटीवरून तळणी ते वाघाळा जाण्यासाठी रस्ता आहे. हे अंतर सहा ते सात किलोमीटर आहे परंतू या मार्गावर भले मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे ह्या मार्गावरून जाण्यासाठी या परिसरातील गामस्थांना , विद्यार्थ्यांना तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना खुप त्रास सहन करावा लागतो.खराब रस्त्यामुळे या मार्गावरून एस टी देखील जात नाही .