सांगोला – गुरुवार दि.१२ मार्च रोजी सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड पार पडणार आहेत. तत्पूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार राजकीय मास्टरस्ट्रोक खेळत सांगोला तालुक्यात प्रथमच ऑपरेशन लोटस मोहीम यशस्वी करून माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या तिन्ही पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. मुंबई येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते आणि माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
सांगोला पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आ.शहाजीबापू पाटील, भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी जि.प सदस्य अशोक शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेतेमंडळींची समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीत सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदाची संधी प्रथम भारतीय जनता पक्षाला देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तर त्यानंतर शिवसेनेचा सभापती होणार असल्याचेही या समन्वय बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. महायुतीच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या या निर्णयानुसारच मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात ऑपरेशन लोटस मोहीम यशस्वीपणे राबविली आहे.
सांगोल्यात पहिल्यांदाच भाजपचा सभापती तर शिवसेनेचा उपसभापती
सांगोला पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजप महायुतीचा सभापती होणार आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जवळा पंचायत समिती गणातील सदस्या पूनम इंगवले या सांगोला पंचायत समितीच्या भाजपच्या पहिल्या सभापती तर नाझरे पंचायत समिती गणातून विजयी झालेले शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.



























