पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम जेव्हा सुरू झाले आहे, तेव्हापासून कायमच वादग्रस्त ठरले आहे. कधी सतत होणाऱ्या अपघातांमुळे तर कधी मनमानी कारभारामुळे आजही गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता वाल्हे गावाच्या प्रवेशालाच दहा फूट उंचीचा भराव टाकून रस्ता करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांची समजूत काढली.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या रस्त्याला होणारा विरोध थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मोडीत काढण्याचा प्रयत्न ठेकेदार व अधिकारी करताना दिसत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे महामार्ग प्राधिकरणाने मुद्दामहून काही गोष्टी वारंवार केल्यासारख्या दिसून येत आहेत. वाल्हे परिसरातील सर्वांत मोठे विद्यालय असलेल्या महर्षी वाल्मीकी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर समोर आपली जागाच नसल्याचे निदर्शनास आल्याने हा भुयारी मार्ग बिनकामाचा ठरला आहे. या महामार्गावर दिवे घाटापासून ते जेजुरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी गावांच्या प्रवेशद्वारालाच उड्डाणपूल बसविले आहेत. मात्र, वाल्हे गावामध्ये प्रवेशासाठी पूल अर्धा किलोमीटर दूर बांधला आहे. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यालाच तब्बल दहा फुटाची उंची देऊन हा रस्ता बनविण्याचा घाट घातला आहे.