किनवट / नांदेड – शहरातील सामाजिक, धार्मिक तसेच आपत्ती व संकटाच्या काळात नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे सच्चिदानंद पवार गुरुस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येणाऱ्या नित्य अन्नछत्र या सेवेला येत्या 31 डिसेंबर रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या सेवाच्या दशकपूर्तीनिमित्त गरजू नागरिकांना तसेच नित्य अन्नछत्र संकल्पनेतील लाभार्थ्यांना वस्त्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पवार गुरुस्वामी यांनी दिली आहे.
नित्य अन्नछत्र ही संकल्पना शहरातील निराधार, अत्यंत गरीब, अपंग, मानसिक व दृष्टिहीन तसेच वृद्ध नागरिकांपर्यंत थेट त्यांच्या निवासस्थानी दररोज अन्न पोहोचवणारी एक आगळीवेगळी व माणुसकीची सेवा आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष शहानिशा करून, कोणताही गाजावाजा न करता ही सेवा गेल्या दहा वर्षांपासून अखंड, निस्वार्थ व सेवाभावाने सुरू आहे.
थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा सर्व प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत सच्चिदानंद पवार गुरुस्वामी यांनी ही सेवा निरंतर सुरू ठेवली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातसुद्धा ही अन्नसेवा एकही दिवस खंडित न होता सुरू होती, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये या सेवेबद्दल मोठा आदर व विश्वास निर्माण झाला असून, लोकसहकार्याच्या माध्यमातून ही सेवा आजही नियमितपणे सुरू आहे.
दरम्यान, 31 डिसेंबर रोजी रात्री लोककल्याणार्थ नर्मदेश्वर महादेव साई मंदिर संस्थान येथे भव्य पडी पूजा, अन्नदान तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविकांनी व अभंग भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेणाऱ्या भाविकांची शहरात मोठी संख्या असते. दीक्षा कालावधीत अन्नदान, वस्त्रदान, नामस्मरण, पूजापाठ यांना विशेष महत्त्व असते. याच भावनेतून 31 डिसेंबर रोजी इतर करमणुकीच्या कार्यक्रमांऐवजी धार्मिक व सेवाभावी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नववर्षाचे स्वागत सेवा, सद्भावना व धार्मिक आचरणातून व्हावे, तसेच अशा उपक्रमांमुळे भारतीय संस्कृती अधिक समृद्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


























