वेळापूर – पिसेवाडी (ता. माळशिरस) येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, पिसेवाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये तब्बल ११० रक्तदात्यांनी रक्तदान करून शंभर बॉटल रक्तसंकलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व जी प सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व रिपाई माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवे जीवन मिळू शकते. महात्मा फुले यांनी समाजासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून आपण त्यांच्या विचारांना खरी मानवंदना देत आहोत. आणि हे प्रत्येक वर्षी आपल्या प्रतिष्ठान कडून केले जाते आहे हेच तरुणांनी पुढे येऊन रक्तदानासारख्या सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मिलिंद सरतापे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “समाजामध्ये रक्ताची गरज कायम भासत असते. अशा वेळी रक्तदान करणारा प्रत्येक व्यक्ती हा एखाद्याच्या जीवनाचा आधार ठरतो. महात्मा फुले यांनी समता व समाजसेवेचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर म्हणजे त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते.” असे विचार व्यक्त केले.
या रक्तदान शिबिराला शिवामृत दूध संघाचे संचालक सुरेश पिसे, संचालक भागवत पिसे, धानोरे माजी सरपंच जीवन जानकर, पिसेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पिसे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व मा सरपंच आण्णासाहेब शेंडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पिसे, खंडू मेहेत्रे, साहिल आतार, प्रकाश पवार, रामचंद्र पिसे गणेश पिसे, तसेच दीपक पिसे, अमोल राऊत, विशाल बोराटे, ज्ञानेश्वर बोराटे, गोरख शेंडे, अमोल पिसे, नवनाथ पिसे, मनोज पिसे आदी उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज येथील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरात एकूण ११० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे व रक्तदात्यांचे आण्णासाहेब शेंडे यांनी आभार मानले.

























