बार्शी – दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी शहरातील नागरिकांना सण साजरा करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांनी काही महत्त्वाच्या सुरक्षा सूचनांचे पालन करुन सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे अवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार घरामध्ये मौल्यवान दागिने, रोकड व इतर किमती वस्तू शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.
बाहेरगावी प्रवास करताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.
गावापासून दूर असलेल्या वाड्यावस्तीवरील घरे किंवा सोसायट्यांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी महिला व नागरिकांनी आपल्या पर्स, दागिने यांची काळजी घ्यावी.
आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती (ज्यांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले असेल) किंवा नंबर प्लेट नसलेली / परजिल्ह्यातील वाहन दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.
मंदिर परिसरात असणाऱ्या दानपेट्या व मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून, दिवाळीचा सण कोणताही अनुचित प्रकार न होता सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.