अक्कलकोट – राज्यातील महसुली गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले आहे. गावातील नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असतात. स्थानिक पातळीवर प्रशासनाची जबाबदारी पार पाडताना त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
दि. १७ डिसेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अधिनियमास तत्कालीन राज्यपालांनी मंजुरी दिली. त्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून १७ डिसेंबर हा पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राज्यात ५० वा पोलीस पाटील दिन साजरा होत आहे. पोलीस पाटील दिन केवळ कौतुका पुरता मर्यादित न ठेवता, या पदाचे महत्त्व अधोरेखित करून त्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस पाटलांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेणे, वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच हक्क, अधिकार व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत, कर्तव्य बजावताना झालेल्या त्रुटींवर आत्मपरीक्षण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील याचा सन्मान केल्यास नवचैतन्य व प्रेरणा मिळते. एकूणच हा दिवस इतिहास व कार्याला उजाळा देणारा आहे.
“पोलीस पाटील म्हणजे आमचा शासकीय सहकारीच” पोलीस पाटील हे गावातील शासनाचा महत्त्वाचा घटक आहेत. मंद्रूप पोलीस ठाण्याने पोलीस पाटलांना सन्मानाने जगण्याची संधी दिली असून, त्यामुळे पोलीस ठाणे व शासनावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते. ग्रामस्थ आणि पोलीस ठाणे यांच्यात दुवा म्हणून पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात.
विलास यामावर, उपविभागीय पोलीस अधिकारी,अक्कलकोट विभाग.
पोलीस पाटलांच्या कार्याची दखल: सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गत वर्षी जिल्ह्यातील ९५० पोलीस पाटलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यंदा सुद्धा करण्यास संगितले आहे. कोरोना महामारी, महापूर व अतिवृष्टीसारख्या आपत्तीच्या काळात पोलीस पाटलांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. अनेक वेळा रात्रंदिवस सेवा देत त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यांच्या प्रलंबित मागण्या शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
— सैपन बेगडे, कार्याध्यक्ष, गाव कामगार पोलीस पाटील संघ, सोलापूर जिल्हा


























