माढा – महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची केंद्र शाळा माढा येथील केंद्रस्तर विशेष शिक्षक प्रविण विलास भांगे यांनी विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षक गटातून , प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता पूर्ण ,सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते.या अनुषंगाने विविध शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा,विभाग स्तरावर सादरीकरण केल्यानंतर राज्य स्तरावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाते. या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना व्हावी तसेच सर्वांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा सात गटामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
प्रविण भांगे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या ” दिव्यांग विद्यार्थ्यांना समस्या ठाई ठाई, न्यूरोथेरपी तेथे वरदान सिद्ध होई” या उपक्रमाचा दिव्यांग विद्यार्थ्यांना झालेला फायदा व सादरीकरणाचे परीक्षण करून परीक्षक डॉ. ह. ना.जगताप , सांगोलकर साहेब, महाले मॅडम यांनी त्यांना प्रथम क्रमांक घोषित केला. तसेच संचालक डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते व सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे , उपसंचालक डॉ.इब्राहिम नदाफ , विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय थिटे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सदर नवोपक्रमासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे व या यशाचे श्रेय पालक विद्यार्थ्यांच्या विश्वासाचे व संयमाचे यश आहे असे विशेष शिक्षक प्रविण भांगे यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी कादर शेख डाएट प्राचार्य नदाफ, अधिव्याख्याता सुभाष बुवा, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी कलाप्पा अजावडरे, केंद्रप्रमुख सुरेश माळी, सर्व शिक्षक सहकारी तसेच गट साधन केंद्रातील सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
























