मंद्रूप – पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार असून तक्रारदारांना योग्य न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिली.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत अवैध व्यवसाय, रोडरोमिओ प्रकार तसेच अल्पवयीनांकडून होणारे वाहतूक नियमभंग यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविणे तसेच ग्राम सुरक्षा दल सक्रिय करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तावित दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी केले, तर आभार अमोगसिध्द लांडगे यांनी मानले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नितीन वारे, गिरमल गुरव, महेश पवार, अशोक सोनकंटले, सहसचिव शिवय्या स्वामी, कार्याध्यक्ष गुरू गायकवाड, सहकार्याध्यक्ष अभिजीत जवळकोटे, खजिनदार समीर शेख, प्रसिद्धीप्रमुख राहुल उड्डाणशिव, प्रमोद जवळकोटे, गजानन काळे, बनसिध्द देशमुख, अप्पू देशमुख, महासिध्द साळवे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


























