सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेची चाहूल लागताच संपूर्ण सोलापूर भक्तिभावाने न्हाऊन निघते. पांढरे शुभ्र वस्त्र, घराघरांत सडा-रांगोळ्या आणि नंदीकौल काठ्यांच्या विवाह सोहळ्याचे आकर्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक सोलापुरकराची धडपड सुरू होते. मात्र, वयाच्या संध्याकाळी उभे असलेले, चालणंही कठीण झालेले आश्रमातील ज्येष्ठ या आनंदापासून अनेकदा वंचित राहतात. हीच भावना ओळखून आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील वात्सल्य आस्था अनाथ वृद्धाश्रमात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीकौल (दोन नंबर काठी) यांचे विधिवत पूजन भक्तिभावाने पार पडले.
अवघ्या सात दिवसांवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस प्रारंभ होत असून, यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षता सोहळा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अनुभवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीकौलाचे मानकरी श्री. राजशेखर हिरेहब्बू व मलकु म्हेत्रे मास्तर तसेच आश्रमातील आजी आजोबा व आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य यांच्या हस्ते नंदीकौलाचे पूजन करण्यात आले.
या पूजनामुळे आश्रमात जणू यात्रेचे पावन वातावरण अवतरले. अक्षता उधळताना काही आजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर काही आजोबांचे हात नकळत देवाकडे जोडले गेले. “आज सिद्धराम आमच्याकडेच आले,” अशी भावनिक प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली.
सोलापूरच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला नंदीकौल काठ्यांचा विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनेक वृद्धांना मिळत नसल्याने, देवाचे नंदीकौल थेट वृद्धाश्रमात आणून पूजन करण्याचा हा उपक्रम वृद्धांसाठी अविस्मरणीय ठरला. या माध्यमातून त्यांना यात्रेतील पवित्र परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
यावेळी आश्रमामधील आजींना व आजोबांना एक नवीन धार्मिक कार्य केल्यामुळे खूप आनंदित उत्साहीत होते
या भावपूर्ण उपक्रमासाठी आस्था फाऊंडेशनचे सर्वेसर्वा श्री. विजय छंचुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वासल्य आस्था निराधार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापिका रेखा घटे व रजनी भाटिया हे पण उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद व शिरा व केळी बिस्किट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. देव येऊन गेल्याची ऊब मात्र आश्रमातील ज्येष्ठांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहिली.

















