सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये अजगरांचा (Indian Rock Python) अधिवास वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे एक 7.5 फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर, आता अक्कलकोट तालुक्यातही अजगर दिसून आला आहे. याची लांबी 8.5 फूट आहे. अक्कलकोट पासून 7 किलोमीटरवर असलेल्या हत्ती कणबस या गावात अजगर जातीचा साप आढळला असल्याने ही घटना सोलापूर जिल्ह्यात अजगराचा अधिवास असल्याचे अधोरेखित करते.
२० ऑक्टोबर रोजी धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात अजगर आढळला होता, तर त्यानंतर काल (३ नोव्हेंबर) हत्तीकणबस (ता. अक्कलकोट) येथेही अजगर आढळला आहे. हत्ती कणबस येथील अजगरास नाग फाउंडेशनचे सर्पमित्र भूकंप जोशी यांनी सुरक्षितपणे पकडले. याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना देण्यात आली. शिंदे यांनी या रेस्क्यूची माहिती वनविभागास कळवत नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार सोबत घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच वनविभागाची टिमही अक्कलकोटला दाखल होत या सापास वैद्यकीय तपासणी साठी अक्कलकोट येथील पशुवैद्यकीय विभागात आणले गेले. येथील तपासणीनंतर हा अजगर सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व घडामोडी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. या घटनेमुळे या भागात अजगरांचा नैसर्गिक अधिवास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यामुळे सोलापूरच्या सर्प वैभवात भर पडली आहे. अजगर हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची 1 अंतर्गत संरक्षित वन्यजीव आहे. यास बेकायदेशीर रित्या पकडणे, बाळगणे, छळ करणे, घेऊन फिरणे, मारणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून 7 वर्षांपर्यंत कैद शक्य आहे. हा बिनविषारी असून शेतातील उंदीर घुस व इतर उपद्रवी प्राण्यांना खाऊन आपल्या शेती व परिसराचे नैसर्गिक समतोल राखतो. अजगर आढळल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ जवळील जाणकार सर्पमित्र अथवा वन विभागाशी (हेल्पलाईन १९२६ क्रमांकावर) संपर्क साधणे आवश्यक आहे.

घटनास्थळी सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे, नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार, अक्कलकोटचे भूकंप जोशी, यादव होटकर, स्वामी होटकर तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक रेणुका सोनटक्के व वनसेवक आकाश पाटोळे तसेच अक्कलकोटचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर होते. या अजगरास वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
गेल्या पंधरवड्यातील हा दुसरा अजगर रेस्क्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्याचा आग्नेय भाग असलेल्या दक्षिण सोलापूर व अक्कलकोट येथे अजगर यापूर्वीही आढळल्याने येथील वातावरण या सापांसाठी पोषक असल्याचे दिसते. तसेच या भागातून वाहणाऱ्या नद्या व नैसर्गिक वनांमुळे अजगारांना नैसर्गिक अधिवास प्राप्त होतो. यापूर्वीही 2020 साली अक्कलकोट जवळील करजगी व 2022 साली गोगाव येथे अजगर आढळल्याच्या नोंदी असून ह्यात नुकत्याच सापडलेल्या धोत्री व हत्ती कणबस येथील अजगारांची भर पडल्याने सोलापूरच्या आग्नेय भागात अजगराचा अधिवास असल्याचे अधोरेखित होते. या अनुषंगाने येथील भागाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.
*सर्प अभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर.*
नाग फाउंडेशनचे अक्कलकोट चे सदस्य भूकंप जोशी यांनी या पूर्वीही अक्कलकोट जवळील गोगाव येथे 2022 साली जवळपास 5 फूट लांबीचा अजगर पकडला होता. परंतु तो त्यांनी तात्काळ सोडला. यावेळी मात्र जोशी यांनी अतिशय सुरक्षितपणे या भल्या मोठ्या अजगरास कसलीही इजा होऊ न देता पकडले असून अजगरास वनविभागाच्या स्वाधीन करून रीतसर नोंद करून घेतली आहे.
*अनिल अलदार, अध्यक्ष नाग फाउंडेशन.*




















