तभा फ्लॅश न्यूज/ वाशी : वाशी तालुक्यात मागील दोन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक मंडळात पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी नागरिक चिंतेत आहेत. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तालुक्यातील तीन पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून किराणा दुकाने, शेतकऱ्यांची खता औषधाची दुकान, पशुखाद्यांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरल्याने दुकानदारांना मोठा फटका बसला आहे.
बाराही महिने नशिबी संकटे असलेला बळीराजा; त्याच्यावर मोठं अस्मानी संकट आलं. मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजा आता संकटात सापडला आहे. एकामागून एक शेतकऱ्याचा संकटाचा त्याला सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. ठिकठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. सर्वत्र पिके न दिसता चहूकडे पाणीच पाणी दिसून येत आहे.
शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाण्याची चिंता मिटली पण शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस असाच पडत राहिला तर यंदा शेतीला केलेला खर्च, बँकांचे कर्ज, पेरणीसाठी घेतलेले खाजगी सावकाराचे पैसे, खत औषधांची उधारी, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा आणि कोठून भागवायचा असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे. शेतमालाचे पडलेले दर त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असताना आता अस्मानी संकटांनी शेतकऱ्याला घेरलं आहे. पन्नास वर्षाच्या तुलनेत यंदा वाशी तालुक्यात पावसानं सर्वाधिक उंचांक गाठला आहे.
शिवारात तलाव फुटल्याची घटना घडली आहे. तर दसमेगाव मांडवा, उंदरे वस्ती वाशी व घोडकी रस्त्यावरील नागरिकांसाठी केलेले पर्याय फुल वाहून गेले आहेत. त्यामुळे पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करत आहे. आता सरकारकडून कधी पंचनामे करण्यात येणार हे पाहणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे तात्काळ नाही केले तर विरोधकांकडून आंदोलने करण्यात येईल असे देखील बोललं जात आहे