आटपाडी – राजेवाडी तलाव सांगली सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याच्या सुचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिलेल्या असतानाही, राजेवाडी तलावाचे, सातारा सिंचन मंडळाकडे हस्तांतरण करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू असल्याचे समजले आहे . या प्रक्रियेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यावर पुन्हा होणारा अन्याय सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी हाणून पाडावा. असे आवाहन आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केले आहे .
११ जुन २०२५ रोजी जलसंपदा मंत्री विखे – पाटील सांगली येथे आढावा बैठकीसाठी आले असता खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी, राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याची मागणी केली होती . त्यावेळी राजेवाडी तलाव सांगली सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याच्या सुचना मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी, अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मंत्री महोदयांच्या सुचनेवरून सांगली जिल्ह्यात आणि विशेष करून आटपाडी तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता . याला ४ महिने होऊन गेले . तथापि राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हायचे दुरच, आता या राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन सातारा येथे नेण्याच्या शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजले आहे . हे धक्कादायक आहे .
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावात तलावाचा मुख्य भरावा आणि पाणी साठप्याचा काही भाग येत असताना राजेवाडी पासून २५ किमी दूरवर असलेल्या म्हसवड शहराचे नाव या तलावाला दिले गेले आहे . हे मुळातच अन्यायी होते व आहे . १८८० साली निर्माण झालेल्या ३ टीएमसी क्षमतेच्या म्हसवड ( राजेवाडी ) तलावाचे मुख्य व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावे. पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे कार्यान्वीत व्हावे आणि महुद येथील शाखा कार्यालया बरोबरच राजेवाडी येथेही शाखा कार्यालय व्हावे . यासह अन्य काही मागण्यांच्या अनुषंगाने अनेक वर्षापासून मागणी केली जात असून गत वर्षभरापासून आपण जोरदार आवाज उठविला आहे .
सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे विद्यमान १४ आमदार महोदय, ६ खासदार महोदय, ६ माजी आमदार महोदय आणि अन्य ४ मान्यवरांनी अशा एकुण ३० मान्यवर महोदयांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहून त्यांचे लक्ष वेधले होते .
माण ( सातारा ), आटपाडी ( सांगली ) आणि सांगोला ( सोलापूर ) तालुक्यांना राजेवाडी तलावाचे पाणी मिळते . तथापि सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ . बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील या मान्यवरांनी आणि आटपाडी तालुक्यातील विविध पक्षाच्या मान्यवरांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावी अशी मागणी खास पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे . आमदार सदाभाऊ खोत यांच्या दि . ७ एप्रील २०२५ पत्रावर मुख्यमंत्री महोदयांनी, तपासून कार्यवाही करावी . असा आदेश जलसंपदाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना, ई . ऑफीस क्र . ८२३९७२८ दि . २३ एप्रील २०२५ रोजी दिले आहेत .
राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन सातारा येथे, उपविभागीय कार्यालय दहिवडी येथे आणि शाखा कार्यालय महुद बरोबर म्हसवड येथे करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे कळल्याचे सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
आटपाडी तालुक्याच्या उशाला असलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी, संपूर्ण आटपाडी तालुक्याला न मिळाल्यानेच हजारो कुटूंबांना स्थलांतर करावे लागले आहे . याशिवाय पाच सहा पिढ्यांचे गत १४० वर्षात अतोनात नुकसान झाले आहे . याकडेही सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले .