बार्शी् – कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर कबड्डी असोसिएशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडल्या.
या स्पर्धेत राज्यातील नामवंत ८ संघांनी सहभाग नोंदवला होता. साखळी पद्धतीने अतिशय चुरशीचे सामने खेळविण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राकेशभाऊ घुले कबड्डी संघ, पुणे यांनी अंतिम सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे रुपये ३१,००० रोख व आकर्षक चषक पटकावला.
द्वितीय क्रमांकाचे रुपये २१,००० रोख व चषक, स्वास्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघाने मिळवला. तृतीय क्रमांकाचे रुपये ११,००० रोख व चषक विभागून— छावा क्रीडा मंडळ, कोल्हापूर व शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, धाराशिव या संघांना देण्यात आले.
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल— बेस्ट रेडर- विशाल ताटे, बेस्ट डिफेंडर- विक्रम परमार, ऑल-राऊंडर- ज्ञानेश्वर जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास डॉ. लक्ष्मीकांत दामा (कुलगुरु) आणि मा. आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत (बार्शी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य राजेंद्र पवार होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सदस्य दिलीप मोहिते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. शशिकांत तांबे, पोलीस निरीक्षक ढेरे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक भारत पवार, महाराष्ट्र महिला कबड्डी असोसिएशनच्या अंधारे मॅडम, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोहित डिसले यांनी केले.
मा. आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या भाषणात कर्मवीर मामासाहेबांनी खेळाला दिलेल्या महत्त्वाचा उल्लेख करत, आजच्या पिढीने खेळ, आरोग्य व शिस्त यांना प्राधान्य द्यावे. विजय-पराजय हे खेळाचे दोन पैलू आहेत; अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने उभे राहावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी स्पर्धेचे कौतुक करत धनसंपत्तीपेक्षा शरीरसंपत्ती मोठी आहे, असा मौलिक संदेश तरुणांना दिला. अध्यक्षीय समारोपात राजेंद्र पवार यांनी विजेत्या संघाचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रेमा दळवी व प्रा. रुपाली शिंदे यांनी केले.
ही संपूर्ण स्पर्धा प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेच्या यशासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

















