पंढरपूर – तालुक्यातील गादेगावचे माजी उपसरपंच आणि सहकार शिरोमणी कारखान्याचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर नारायण फाटे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने गादेगाव येथे निधन झाले. त्यांच्यावर गादेगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र फाटे कुटुंबियांनी कै.ज्ञानेश्वर उर्फ आप्पा नारायण फाटे यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसाचा अर्थात रक्षा विसर्जन कार्यक्रम परंपरागत पद्धतीने रक्षा किंवा (माती ) विसर्जित न करता (कै. ) आप्पांच्या स्मृतींना साजेशा अशा वृक्षारोपणाचा मार्ग स्विकारुन त्यांच्या आयुष्यभराच्या संवेदनशील, समाजप्रिय आणि निसर्गप्रेमी विचारांना डोळ्यासमोर ठेवत जमिनीत खड्डे करुन त्या मध्ये रक्षा मिसळून त्या खड्यातून काही रोपे लावली आणि तिसऱ्या दिवसाच्या पर्यावरणपुरक विधीव्दारे त्यांच्या आठवणींना खरोखरच हिरवाईची शाश्वत भेट दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन करताना फाटे कुटुंबियांच्या मनात देखील वेदना दाटून आल्या.पण त्याच वेदनेतून एक सकारात्मक, पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी पाऊल उचलल्याचे समाधान देखील मिळाल्याची भावना समस्त फाटे कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली.
दरम्यान परंपरागत पध्दतीने केल्या जाणाऱ्या रक्षाविसर्जन कार्यक्रमास फाटा देत या आगळ्यावेगळ्या पर्यावरणपुरक पध्दतीने केलेल्या रक्षाविसर्जन कार्यक्रमा बद्दल समस्त फाटे कुटुंबियांचे गादेगावसह पंचक्रोशी मध्ये सर्वत्र कौतूक केले जात आहे.
————————–
आप्पांच्या संस्काराचे जीवंत प्रतिक –
आज हे केवळ रोप नाही तर आप्पांच्या संस्कारांचे, त्यांच्याकडून मिळालेल्या मायेचे, माणुसकीचे आणि मार्गदर्शनाचे जिवंत प्रतीक आहे. ते वाढत राहील, फुलत राहील आणि आप्पांच्या आठवणींप्रमाणेच आमच्या हृदयात सदैव रुजलेले राहील.
नागेश फाटे ( प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवार गट) पक्षाच्या उद्योग, व्यापार सेल )






















