सोलापूर लोकसभा मतदारसंघात मशिदींचा मुद्दा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उचलून धरला आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांना माहिती देताना राम सातपुते म्हणाले की, मोदींना पाडण्यासाठी मशिदींमधून फतवे निघत आहेत. राम सातपुते यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र पडसाद उमटले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी तक्रार दाखल केली आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मशिदींचा मुद्दा उचलून धरला आहे. मी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे. मशिदींमधून फतवे निघत असल्याची तक्रार मी स्वतः करणार आहे, असं राम सातपुते यांनी शहरातील एका भाषणा दरम्यान सांगितले आहे.
राम सातपुते यांनी असाही आरोप केला आहे की, समोरचे उमेदवार आणि त्यांचा पक्ष ही निवडणूक धर्मावर घेऊन चालले आहेत. मशिदींमधून फतवे काढण्याचा विरोधक जे काम करत आहेत, त्यांना उत्तर देण्याची अत्यंत गरज आहे. कारण भाजपच्या विरोधातील उमेदवार हे मशिदींचा वापर करत आहेत. जिथं जिथं राज्यात काँग्रेसची सरकार आली आहे, त्या राज्यात नेहा हिरेमठसारखे लव जिहाद सारख्या घटना घडत आहेत, अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.
साखर पेठ येथील एका मशिदीच्या जमिनीवर सर्व धर्माचे रहिवाशी वास्तव्य करत आहेत. येथील रहिवाशांना बांधकाम करण्यासाठी वक्फ बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. यावरून सोलापुरात जानेवारी महिन्यात हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढत सभा देखील घेण्यात आली होती. हा मुद्दा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शहरातील एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा उचलून धरला आहे. सोलापुरातील नई जिंदगी परिसरात काँग्रेसची लोक वास्तव्यास आहेत. भविष्यात आमची लोकसंख्या वाढेल. शहरातील भाजपच्या बंगल्यावर आमचे ताबे असतील, पण हे होऊ देणार नाही, असे वक्तव्य राम सातपुते यांनी केले आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवार पेठ येथील शंकर लिंग सांस्कृतिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. या मेळाव्यामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष प्रविण दर्गोपाटील यांनी प्रस्तावना केली. तुळशीदास भुतडा नगरसेवक अमर पुदाले,नागेश भोगडे, सोनाली मुटकिरी, शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अन्नाराव धनशेट्टी, संगमनाथ बागलकोटी, राजश्री थळगे, गुरुराज बिज्जरगी, विध्याधर शाबादि, सतीश महाले, महिला भगिनी आणि कार्यकर्ते उपस्थित होते