मंद्रूप – इस्लामी संस्कृतीतील पवित्र सण रमजान ईद मंद्रूपमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान महिन्यातील उपवास आणि उपासना पूर्ण केल्यानंतर चंद्रदर्शन होताच शव्वाल महिन्याचा प्रारंभ होतो आणि त्याच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून नमाज अदा केली. यावेळी सामाजिक एकतेचे दर्शन घडले. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक” म्हणत शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
ईदनिमित्त ‘शिरखुर्मा’ हा पारंपरिक गोड पदार्थ तयार करण्यात आला. दिवसभर घरोघरी पाहुणचार सुरू होता. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
दरम्यान, सण शांततेत पार पडावा यासाठी मंद्रूप पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या.
























