सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शहर विकास व नागरी सुविधा अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जुळे सोलापूर परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची आज प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी राबविण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा, सुरक्षितता व वेळेची पूर्तता यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रूपा भवानी चौक व लेप्रसी कॉलनी, जुळे सोलापूर येथे नागरिकांच्या सोयीसाठी नवीन रॅम्पचे काम सुरू असून, त्या कामाची पाहणी करताना रॅम्प अधिक सुरक्षित, सुलभ व दर्जेदार असावा, तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच इंद्रधनु येथील कचरा संकलन केंद्रात प्रस्तावित नवीन शेड उभारणीच्या कामाचीही पाहणी केली. कचरा संकलन व व्यवस्थापन प्रक्रिया स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पावसाळ्यातही सुरळीतपणे चालू राहण्यासाठी शेड उभारणी आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नमूद केले. या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा व कामाच्या सोयींचा विचार करून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.


























