सोलापूर : डीएव्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी “रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग” या अत्यंत महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण विषयावर एक दिवसीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. बदलत्या आर्थिक, कर व बँकिंग व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर परिषदेचे उद्घाटन मान्यवर प्रा डॉ बी. एच. दामजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रातील संरचनात्मक बदल, डिजिटायझेशन, आर्थिक समावेशन तसेच बँकिंग क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर सविस्तर विवेचन केले. यासोबतच भारतातील विद्यमान कररचना, थेट व अप्रत्यक्ष करांचा केंद्र सरकारकडून होणारा वापर, विकासात्मक योजनांमधील करांचा सहभाग याविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते न थांबता प्रत्यक्ष व्यवहारज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे, परिषदेचे समन्वयक डॉ. ए. एच. बोबडे, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा परिषदांमुळे विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होतो, असे मत व्यक्त केले.
परिषदेच्या पहिल्या तांत्रिक सत्रात सोलापूर येथील नामवंत सनदी लेखपाल चेतन नोगजा यांनी भारतातील कर क्षेत्रात अलीकडील काळात झालेले बदल, जीएसटी प्रणालीतील सुधारणा, कर अनुपालनाची गरज तसेच या बदलांचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना कर क्षेत्रातील व्यावहारिक बाबी समजण्यास मदत झाली.
दुसऱ्या तांत्रिक सत्रात सनदी लेखपाल सचिन कत्ते यांनी अकाउंटन्सी क्षेत्रातील नॉन-कॉर्पोरेट व्यवसायांसाठी आर्थिक पत्रके नवीन पद्धतीने कशी तयार करावीत, लेखांकन मानके, अहवाल सादरीकरणातील बदल याविषयी सखोल माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायिक लेखांकनाची दिशा स्पष्ट झाली.
परिषदेच्या समारोप सत्रात एस. बी. भांजे यांनी विद्यार्थ्यांना करिअर संधी, व्यावसायिक नैतिकता व सातत्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
सदर परिषदेसाठी एकूण १५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परिषदेचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी भूषविले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. कपिल रंगदळ यांनी केले. तर डॉ. साजिद पटेल, डॉ. नागसेन गवळी, श्री. सिद्धार्थ गायकवाड व श्रीमती धानम्मा गणेचारी यांनी विविध घटकांचे आभार मानले.
या परिषदेस महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेमुळे विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, टॅक्सेशन व बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या प्रवाहांची सखोल माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.






















