सोलापूर – महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजप पक्षांतर सर्वपक्षीय मुलाखतीचा जोर वाढलेला दिसत आहे. सत्तेतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुलाखतीचा सिलसिला मंगळवारी सकाळी सुरू झाला. ४०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केल्याने मुलाखती घेण्यासाठी मोठी गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात सकाळपासून झाली होती. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, चंद्रकांत दायमा, सरचिटणीस आनंद मुस्तारे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी अनेकांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आपल्या मुलाखती सादर केल्या.
या मुलाखतीमध्ये विशेष आकर्षण म्हणजे तृतीयपंथी अबोली मंजेली यांनी देखील मुलाखत दिली. आपल्या जथ्थ्यासह राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रभाग ९ मध्ये महापालिका लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली. अजित पवार यांचे कार्य चांगले असल्याने उमेदवारी मागत असल्याचे सांगितले. ४०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय गजबजून गेले होते.
चौकट
मुलाखती संपूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर करू
सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाकडे अर्ज सादर केले होते. त्या इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारपासून सुरू झाल्या. ४०० इच्छुकांनी अर्ज सादर केल्याने प्रभाग रचनेनुसार सर्वांच्या मुलाखती घेतल्या. लवकरच इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी प्रभाग रचनेनुसार जाहीर करण्यात येईल. त्या अगोदर संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासोबत चर्चा विनिमय करून ही अंतिम यादी जाहीर करू.
- संतोष पवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौकट
मुलाखतीमध्ये हे विचारले प्रश्न
प्रभागाची एकूण लोकसंख्या ?
एकूण किती मतदार आहेत ?
जातीय समीकरण कसे आहे.?
शिक्षण किती आहे?
कोणता भाग येतोय प्रभागात ?
सध्याचे नगरसेवक कोण ?
सामाजिक क्षेत्रात तुमचे योगदान काय?

























