सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे सहारा नगर येथील आयडियल सेमी इंग्लिश व उर्दू माध्यम शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक विकल्पांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड, क्षमता व ध्येय लक्षात घेऊन योग्य शैक्षणिक शाखेची निवड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपण प्रशासकीय सेवेत याप्रमाणे कलेक्टर, शिक्षक, पोलीस, पीएसआय, डॉक्टर, इंजिनियर, तसेच शासकीय कर्मचारी होण्यासाठी कोणत्या शाखेची निवड करावी आणि त्यासाठी आतापासून अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत त्यांनी विशेष माहिती दिली. या मार्गदर्शनाचा दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
याप्रसंगी क्लबचे सदस्य रोटे. डॉ. शिवगंगा मैंदर्गी व रोटे. भारत कदम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक इरफान जनवाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक राशीद दखनी यांनी केले.

























