नवी दिल्ली, ४ जुलै (हिं.स.) : १८ व्या लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांनी जय फिलिस्तान, जय हिंदूराष्ट्र.. अशा घोषणा दिल्याने सभागृहात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. त्यावर झालेल्या वादंगानंतर लोकसभा अध्यक्षांनी शपथविधी सोहळ्यातील नियमांमध्ये आणखी स्पष्टता केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित काही बाबींचं नियमन करण्यासाठी ‘निर्देश-१’मध्ये नवीन खंड जोडलं आहे. हा मुद्दा पहिल्या नियमांमध्ये नव्हता. लोकसभा अध्यक्षांनी नियम ३८९ मध्ये सुधारणा करुन त्यात स्पष्टता दिली आहे. शपथग्रहण सोहळ्यातील सुधारणांमुळे आता कोणताही खासदार कसलीही घोषणा, शेरेबाजी, नारेबाजी करु शकणार नाही. अशा पद्धतीने शपथविधी सोहळ्यात काही वेगळे शब्द उच्चारले तर त्या खासदाराविरोधात कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे सुरक्षित असतील. नवीन नियमांनुसार, संसदेचे सदस्य, भारताच्या संविधानातील तिसऱ्या अनुच्छेदामध्ये निर्धारित शपथ प्रारुपानुसारच शपथ घेतील आणि त्यावर हस्ताक्षर करतील. त्याशिवाय शपथ घेतेवेळी कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करता येणार नाही.
काय आहे प्रकरण?
अठराव्या लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली, त्यावेळी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय भीम, जय फिलिस्तीन अशा घोषणा दिल्या. तर गाझियाबादचे भाजप खासदार अतुल गर्ग यांनी जय फिलिस्तीनच्या उत्तरात अटल बिहारी वाजपेयी जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद.. अशा घोषणा दिल्या.
खासदारांच्या या कृतीने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता नियम ३८९ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.