आगामी तीन दिवस कोसळणार मुसळधार पाऊस
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) : पूर्वोतर भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेशात पुराचे थैमान सुरू असानाच दिल्लीसह देशातील 26 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढचे 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार देशातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम आणि हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मान्सूनने त्याच्या नियोजित वेळेच्या 6 दिवस आधी म्हणजेच 2 जुलै रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्येकडील भागात परिस्थिती बिकट आहे. मणिपूर आणि आसाममध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मणिपूरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचवेळी नागालँडमध्ये गेल्या काही दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमुळे सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने सांगितले की पुढील 24 तासांत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, बिहार, झारखंड, दिल्ली, पूर्व गुजरात, कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगाल, पूर्व राजस्थान, विदर्भ, ओडिशा, केरळ, हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ आणि लक्षद्वीपच्या गंगा मैदानावर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, लडाख, रायलसीमा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवसांत देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय येथे 4 ते 6 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.