बार्शी – येथील नवीन मराठी शाळेत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आशा घल्लाळ यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात आशा घल्लाळ यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शनपर भाषण केले. स्वच्छता, समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश नायकुडे यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
























