पंढरपूर – दरवर्षी ग्रिष्म ऋतुमधील वाढत्या उन्हाच्या तीव्रते पासून विठुरायास शितलता मिळावी या भावनेतून पाडव्या पासून चंदनउटी पुजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुरुवारी पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे.
‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती’ संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे. गुढी पाडव्यापासून विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटी पूजा सुरू झाली आहे. मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. पाडव्या पासून दररोज दुपारी चार वाजता मोठ्या भक्तीभावाने विठुरायाची चंदन उटी पूजा संपन्न होत असते.
उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राणीमात्राला जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे ही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. ही परंपरा अनेक शतकापासून मंदिरात सुरू आहे.
सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या सर्वांगाला ( चेहरा सोडून ) लेप लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात.
चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते. यंदा देखील आँनलाईन पध्दतीने पुजेचे बुकिंग सुरु केले होते. त्याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून ९५ टक्के चंदन उटी पूजेचे बुकिंग झाल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक भोसले यांनी सांगितले. चंदनउटी पुजा ही भाविकांमार्फत मंदिर समिती करीत आहे. त्यामुळे मंदिर समितीला देखील चांगले उत्पन्न ही मिळते.दर वर्षी गुढी पाडवा ते मृग नक्षत्र पर्यंत दररोज दुपारी चार वाजता खास चंदन उटी पूजा केली जाते. चंदन हे अतिशय सुगंधी,शीतल असते.चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठुरायाला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो.
————————-
अशी केली जाते चंदनउटी पुजा
पाडव्या पासून या चंदन उटी पुजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे. या पुजेच्या वेळी विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मुर्तीला चंदनाचा लेप लावण्यात येत असतो हे या पुजेचे खास वैशिष्ठ आहे. विठ्ठल मुर्तीचा चेहरा सोडून बाकी माने पासून ते कमरे पर्यंतच्या सर्वांगाला या पुजेच्या वेळी चंदनाचा लेप लावला जात असतो.
———————————–
ऋतुमानानुसार विठुरायाच्या खानपानात होतो बदल
चंदन उटीपूजे नंतर देवाला शिरा, पोहे, सुका मेवा कैरीच पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवद्य ही दाखवला जातो. चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळूर, म्हैसूर येथून उच्च प्रतीचे सुंगधी ४०० किलो चंदन खरेदी केले आहे. पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे देवाचे रुप सुवर्णालंकारा पेक्षाही उठून दिसते म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात.























