सोलापूर – राज्यात कांद्याच्या विक्रमी उलाढालीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन संचालक मंडळांना कामकाज करावे. शेतकऱ्यांसाठी पूर्णब्रह्म योजनेच्या माध्यमातून अत्यल्प दरात जेवणाची सुविधा तसेच आता नव्या निर्णयानुसार विद्यार्थी वस्तीगृहात शेतकरी भवन उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून, शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व मूलभूत सोई सुविधासह समाधानकारक व्यापार करत बाजार समितीने त्या सर्व मागण्या तडीस न्याव्यात, अशी एकच निर्मळ अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. दिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला बाजार समितीमधील व्यापार आता सुरळीत सुरू झाल्यानंतर बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील चढउतार पाहता भावनांना मोकळी वाट करून दिली.
राज्यात विक्रमी उलाढाल आणि उत्पन्नासाठी अल्पावधीतच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील नाशिक लासलगाव कांद्याच्या बाजारपेठात सोलापूर बाजार समितीचे मोठे नाव आहे. सोलापुरातील बाजारात मिळणारा भाव हा सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना परवडणारा असतो. त्यामुळेच शेतकरी विश्वास ठेवून सातत्याने सोलापूर बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणतो. येथील अडते, खरेदीदार आणि व्यापारी, यांच्या माध्यमातून कांद्याची बाजारपेठ दक्षिण भारतासह पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतात पसरली आहे. सोलापुरातील कांदा सर्वत्र विकला जात आहे. त्यामुळेच कांद्याची मागणी वाढून भाव देखील चांगल्या दरात मिळत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला शेतमाल पूर्णतः नष्ट झाला. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणला जाणारा कांदा, भाजीपाला, फळभाजी तसेच फळे या शेतमालाच्या दरात चढ- उतार निर्माण झालेली दिसत आहे.
दरम्यान, सोलापूर बाजार समिती कांद्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध असताना कांद्याचे दर सध्या स्थिरच आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात उठाव नसल्याने शेतकरी देखील वाढीव दराच्या अपेक्षित आहे. मध्यंतरी पावसामुळे कांदा वावरातच भिजला, त्यामुळे नसलेला कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याने दर जैसे थेच आहेत. दिवाळी सुट्ट्यानंतर शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये पूर्वव्रत कामकाज सुरू झाले. त्यावेळी बाजारात २५० ट्रक कांद्याची आवक आली होती. बाजारपेठा बंद असल्यामुळे त्या कांद्याला प्रत्येक क्विंटल किमान १५० रुपये ते कमाल २२०० रुपये तर सर्वसाधारण १८०० रुपये असा दर मिळाला. मात्र त्यानंतर कांद्याच्या आवक आणि दरामध्ये घसरण सुरूच आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये १५० ट्रक कांद्याची आवक येऊन देखील दर १५०० इतकाच राहिला आहे. आवक कमी होऊन देखील दरात घसरण कायम आहे. आता कांद्याची नवी खेप बाजारपेठेत विक्रीसाठी येणार असल्याने दर वाढेल, अशी शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीने व्यवहारात चोखंदळ असावे.
बाजार समिती प्रशासनाच्या वतीने संबंधित अडते खरेदीदार व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पट्टीमध्ये नेहमीच गोंधळ निर्माण होतो. अनेक व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. अशा व्यापाऱ्यांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. वारंवार पट्ट्या बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांचा परवाना रद्द करावा. अशा घटना बाजार समितीमध्ये घडताना दिसतात. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होतो.
– बळी कादे, कांदा उत्पादक शेतकरी कासेगाव
शेतकरी भवन आवश्यक.
परजिल्ह्यातून आपला शेतमाल सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी शेतकरी भवन गरजेचे आहे. बाजार समितीमध्ये अंतर्गत रस्ते लाईट आहेत.परंतु पाणी आणि शेतकरी भवन यांची कमतरता आहे. मुबलक पाणी मिळावे. शेतकऱ्यांना विसावा घेण्यासाठी शेतकरी भवन लवकरात लवकर तयार करावे.
– नेताजी पाटील, शेतकरी दक्षिण सोलापूर
आर. ओ. प्लांट सुरू ठेवावे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिल्टर पाण्याचे आर.ओ.प्लांट तयार केले. परंतु हे प्लांट चालू आहेत का नाही? हे माहित नाही. स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे हीच अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बाजार समिती आवारात स्वच्छता असावी.
– भैरू पाटील, शेतकरी उळेगाव
शेतकऱ्यांची फसवणूक आणि शेतमाल चोरी जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे.
सोलापूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणारा शेतकरी हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांवरच बाजार समिती अवलंबून असून, शेतकऱ्यांच्या सुविधासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रयत्न करावेत. वाढीव दर तसेच भौतिक सुविधा पुरवाव्यात. शेतकऱ्यांची फसवणूक आणि शेतमाल चोरी होऊ नये यासाठी उपाययोजनात्मक कार्यवाही करावी.
– कल्लप्पा फुलारी, शेतकरी आचेगाव



















