बार्शी – सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व संपादन करत पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या स्व. शिवाजीराव डिसले यांच्यासारख्या व्यक्ती प्रेरक असतात, असे मत सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी व्यक्त केले.
अर्णव शैक्षणिक संकुल सासुरे फाटा वैराग ता.बार्शी येथे कै. बाबुराव डिसले जीवन गौरव स्मृती पुरस्कार वितरण सोहळा, सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव डिसले शेठ यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त व शैक्षणिक संकुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसाठी अर्णव शैक्षणिक संकुल आपल्या अंगभूत कौशल्याला वाव देणारा रंगमंच असल्याचे सांगितले.
आपल्या शालेय जीवनातील आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच संकुलातील उपक्रमांची स्तुती केली.अष्टावधानी विद्यार्थी घडवणे ही शिक्षकांची जबाबदारी असून समाजातील प्रत्येक घटकाला शाळेबद्दल आस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी मंडळाच्या सामाजिक कामाचा आढावा घेतानाच शैक्षणिक संकुलातील गुणात्मक वाढीवरही प्रकाश टाकला.
सूर्यकांत क्षीरसागर, राणुबाई जगताप, प्रदीप कापसे, विजय निलाखे, भीष्माचार्य चांदणे, गणेश शालगर, नझीर शेख, प्रा.किरण देशमुख, भगवंत साळवे, ह.भ.प.तुकराम मस्के, शशिकांत लांडगे, प्रसाद मोहिते यांना विविध क्षेत्रातील कार्याबद्दल कै. बाबुराव डिसले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चित्रपट गीते, देशभक्तीपर गीते व लोक गीतांसोबतच ज्वलंत विषयावर भाष्य करणारी नाटिका विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. सोमनाथ घायतिडक यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास ढेकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संस्था सचिव रवींद्र कापसे, मुख्याध्यापिका अर्चना डिसले, अरुण बारबोले, पो नि कुंदन गावडे, सिनेअभिनेते सुमीत तनपुरे, महेश साठे, माजी सभापती अनिल डिसले, सचिन डिसले, अर्णव कापसे,अद्विक कापसे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


















