बार्शी – पंढरपूर येथील मेकॅनिकल इंजीनियर वेदांत श्रीकांत उत्पात यांची नामांकित आयआयटी गुवाहाटी येथे पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. दरम्यान आयआयटी गुवाहाटीने घेतलेल्या मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आहे.
तत्पूर्वी वेदांत उत्पात यांचे शालेय शिक्षण द.ह. कवठेकर प्रशाला, पंढरपुर येथून झाले असून त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी शेळवे येथील नामांकित सिंहगड महाविद्यालयातुन उत्तम गुणांसह पूर्ण केली.
लहानपणापासूनच उच्च शिक्षणाची आकांक्षा उरी बाळगून त्यांनी स्वकष्टार्जित यश प्राप्त केले आहे. शालेय शिक्षणातील त्यांची हुशारी त्यांच्या शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या कौतुकात दिसून येते.
या कामगिरीबद्दल महाविद्यालय स्तरावर सर्व प्राध्यापकांनी वेदांत उत्पात यांचे अभिनंदन केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय विभागातील अध्यापकांचे प्रोत्साहन उत्पात यांच्या पाठीशी नेहमी होते. या यशात मेकॅनिकल विभागातील सर्व अध्यापक वर्गाचे आणि कुटुंबीयांचे देखील योगदान आहे.त्यांचे हे यश ग्रामीण, निमशहरी तसेच छोट्या शहरी भागातून उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणारे आहे. वेदांत उत्पात यांना त्यांच्या या भरारीबद्दल आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी पालक, शिक्षक मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले.
















