सोलापूर – वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” या अभियानांतर्गत १ एप्रिल ते १० जुलै २०२६ या कालावधीत सोलापूरमधील शेकडो तरुणींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर येथील साई मंदिर (जुने घरकुल) येथे दिनांक ४ ते १० एप्रिल या दरम्यान ७ दिवसीय विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.
या ७ दिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षक धनंजय बोकडे यांनी २५ युवतींना लाठी-काठी, निःशस्त्र युद्धकला, नानचाकू, तसेच विविध स्वसंरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण दिले. या शिबिरात केवळ शारीरिक प्रशिक्षणावर भर न देता, समाजात सुरक्षित वावर कसा ठेवावा, संकटसमयी कसा प्रतिकार करावा आणि हिंदु धर्माचे महत्त्व काय आहे, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षित युवतींनी लाठीकाठी आणि नानचाकूचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी ‘आम्ही स्वतः कधीही अत्याचाराला बळी पडणार नाही आणि इतर कोणत्याही महिलांवर अन्याय होऊ देणार नाही,’ अशी सामूहिक शपथ युवतींनी घेतली.
कार्यक्रमास शिबिरार्थींचे पालक उपस्थित होते. तसेच सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर, हिरालाल तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे संकेत पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई मंदिराचे विश्वस्त राहुल तलकोकूल आणि मनोज बुधाराम यांचे सहकार्य लाभले.
























