मंगळवेढा – सुबक व आकर्षक दीपोत्सव 2025 ही रांगोळी,सुमारे दोन हजार पणत्यांचा लख्ख प्रकाश,गणेश विहिरीतील थर्माकोलचे ब्रम्हकमळ, फटाक्यांची आतषबाजी,भजनसंध्या कार्यक्रम आदींमुळे मंगळवेढयातील श्री गणेश मंदिर परिसर गणेशभक्तांच्या गर्दीने गजबजून गेला होता.
निमित्त होते,कार्तिक संकष्टीनिमित्त श्री गणेश परिवाराने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे. सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानचे मंगळवेढयात श्री गणेश मंदिर असून गेल्या वीस वर्षापासून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.
सायंकाळी सर्व पुरोहितांकडून श्री गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून मंत्रोपचारात श्री गणेशाची आरती करण्यात आली.
चळे ता.पंढरपूर येथील भजनरत्न अमित मोरे व सहकार्यांच्या भजनसंध्या या कार्यक्रमास मंगळवेढेकरांनी उत्स्फुर्त दाद दिली. या कार्यक्रमामुळे सायंकाळचे वातावरण भक्तीमय व सुरमय बनले होते.
एका पाठोपाठ एक दिवे लागत गेले अन बघता बघता असंख्य दिव्यांच्या तेजाने गणेश मंदिर परिसर उजाळून निघाला.शेकडो दीप तेवू लागल्याने मंदिरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.मंदिर परिसरात कळसापासून गाभार्यापर्यंत असंख्य दिव्यांनी पूर्ण मंदिर सजविण्यात आले.
मंदिर परिसरामध्ये देवयानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोमल घोडके, शितल घोडके, मनस्वी रायबान, श्रावणी रायबान, ऋतुजा घुले,वैष्णवी ताटे,श्रावणी करकरकर, ऋतुजा करमरकर, आलिशा मुल्ला, यशश्री क्षीरसागर, माही बजाज, रेवती राऊत, मुनीर मुल्ला, कन्हैया बजाज,मल्हार देशमुख,चैतन्य वेदपाठक व सहकार्यांनी आकर्षक रांगोळी काढली होती. दीपोत्सव 2025 ही रांगोळी तसेच पेंटर सदाशिव जामदार यांनी थर्माकोलच्या सहाय्याने बनविलेले विहिरीतील ब्रम्हकमळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
पारंपारिक उत्साह,श्रध्दा आणि दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.हा दिव्य सोहळा भक्ती,आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचा अदभूत संगम ठरला.
दीपोत्सवाच्या लखलखाटात उजळलेले मंदिर परिसराचे दृष्य भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरले.
फोटो ओळ -कार्तिक संकष्टीनिमित्त मंगळवेढयातील श्री गणेश मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.




















