जालना : तालुक्यातील हिवर्डी या छोट्याशा गावातून निघालेल्या जिद्दी युवकाने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. विशाल राजेश भुतेकर यांनी गुजरात येथे झालेल्या इंडियास्किल्स स्पर्धा 2025-26 पश्चिम विभागीय स्पर्धेत सॉफ्टवेअर अप्लिकेशन डेव्हलपमेंट या कौशल्य प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
पश्चिम विभागातील पाच राज्यांतील नामांकित स्पर्धकांमध्ये झालेल्या कडव्या चुरशीच्या स्पर्धेत विशाल यांनी आपली बुद्धिमत्ता, अचूक कोडिंग कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर अव्वल क्रमांक मिळवला. मर्यादित वेळेत गुंतागुंतीच्या समस्यांवर कार्यक्षम व नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर उपाय तयार करणे ही स्पर्धेची मुख्य अट होती. कोडिंग, डिझाईन पॅटर्न, डेटाबेस व्यवस्थापन, युजर इंटरफेस डिझाईन आणि प्रेझेंटेशन या सर्व निकषांवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. विशाल सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संगणक अभियांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत.
ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्याने अत्याधुनिक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण यश मिळवणे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशानंतर विशाल आता नोएडा (दिल्ली) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्या यशाचे श्रेय देताना विशाल यांनी आई-वडील, प्राध्यापक आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.
मर्यादित साधनसामग्री असली तरी जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, असे ते म्हणाले. पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी अधिक जोमाने तयारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हिवर्डी गावात त्यांच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून सत्काराची तयारी सुरू आहे. मातीचा सुगंध मनात आणि हातात लॅपटॉप घेऊन मोठी स्वप्ने पाहणारा हा ग्रामीण युवक आता अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.






















