बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उपमुख्याध्यापक येवले, संस्थापक नलवडे सर तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
संस्थापक नलवडे सर यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व ओळखून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप यांनीही महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता सादरीकरण व घोषवाक्यांच्या माध्यमातून महात्मा फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले असून शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.


























